पुणेकरांना पाण्याची चिंता लागली होती. गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

साडेअकरा टीएमसीची वाढ

गेल्या तीन दिवसात खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमधील पाणीसाठ्यात 11.5 टीएमसी इतकी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 20.21 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला धरणातून गेल्या दोन दिवसांत दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आतादेखील धरणातून 7 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे.

Advertisement

पवना धरण 71 टक्के भरले

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली.

सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी 24 जुलैला तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुकडी धरणसाठ्यात 4.2 टीएमसीची वाढ

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात 4.2 टीएमसीची वाढ झाली आहे.

Advertisement

कुकडी प्रकल्प अंतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे.

पिंपळगाव जोगा धरणात कमी पाणी

सध्या वडज धरणातून सध्या मीना नदीत 523 इतका क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तर पिंपळगाव जोगा धरणातून मृत साठा काढल्याने या धरणात 100 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यात वाढ होऊन या धरणात वजा 798.दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

Advertisement