कोरोनाच्या एकामागून एक लाटामुळं व्यापा-यांचं नुकसान होत आहे. बदललेल्या वेळेचा मुंबईतील चार लाख व्यापा-यांना फटका बसत आहे.
निर्बंधाच्या चाैकटीत अडकले व्यापारी
कोरोनासंकटामुळे गेल्या वर्षापासून व्यापारी निर्बंधांच्या चौकटीत अडकले असून त्यांचे न पेलवणारे नुकसान होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाही दुकानांना असलेल्या वेळेच्या निर्बंधांमुळे महामुंबई परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्बंधांचा चार लाख व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.
१५ टक्के व्यापार बंद
कोरोनासंकट कायम असल्याचे म्हणत राज्य सरकारने पुन्हा एकदा व्यापार व व्यवसायावर वेळेचे निर्बंध आणले आहेत.
सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत व शनिवार-रविवारी बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे; परंतु त्याचा व्यापारीवर्गाला भीषण फटका बसत आहे.
याबाबत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, की आधीच वर्षभराच्या कोरोना संकटामुळे व्यापारीवर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. किमान १५ टक्के व्यापार बंद झाला आहे.
वीकएंडमुळे जादा नुकसान
व्यापाऱ्यांनी हिंमतीने कोरोनाच्या दोन लाटानंतरही व्यवसाय सुरू केला होता; पण पुन्हा एकदा सरकारने निर्बंध आणले आहेत. यामुळे आता व्यापारीवर्गाची दयनीय अवस्था होत आहे.
शनिवार-रविवार हे विक्रीचे सर्वांत मोठे दिवस असतात. त्याच दिवशी बाजारपेठा बंद ठेऊन सरकारला नेमके काय साधायचे आहे, हे कळेनासे झाले आहे, असे ठक्कर म्हणाले.