शहरांत कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी आता तो ग्रामीण भागात वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांमध्ये संसर्ग कायम असून, संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एक हजार २५४ रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागात संसर्गाचा धोका कायम

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग ओसरत असला, तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पुणे शहरापाठोपाठ ग्रामीण भागांत एप्रिल आणि मे महिन्यात ४६५ गावांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली होती.

त्यानंतर जिल्ह्यातील संसर्ग कमी होत राहिल्याने गावांची संख्या पुन्हा कमी होत गेली. सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या ८८ इतकी आहे.

धडक सर्वेक्षण मोहीम

जिल्हा परिषद प्रशासनाने १०७ गावांवर लक्ष ठेवले होते. त्यानंतर धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १३ आणि १४ जुलै रोजी धडक मोहिमेअंतर्गत पाच लाख १७ हजार ९२७ घरांची तपासणी करण्यात आली होती.

त्यासाठी पाच हजार १२ पथके कार्यरत होती. त्यामध्ये २० हजार ९२५ संशयित रुग्ण आढळले होते. त्या संशयितांची नमुना चाचणी केल्यानंतर त्यामध्ये ४२२ कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.