राज्यात कारागृहातही कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. आज आपल्याकडे 52 कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. कारागृहात कोरोनाचे 73 सक्रिय रुग्ण आहेत.

तर 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यातील कारागृहात 87 हजार कोरोना चाचणी केल्याची माहिती तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली.

पुण्यात आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामानंद यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. कोरोना संकटाच्या काळात कारागृह विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितलं.

Advertisement

क्षमतेपेक्षा १५२ टक्के कैदी जास्त

राज्यातील 60 कारागृहात क्षमतेपेक्षा 152 टक्के जास्त कैदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 हजार 115 कैदी न्यायालयाच्या आदेशाने सोडले. कोरोना काळात नऊ कारागृहात लॉकडाऊन पाळल्याचेही रामानंद यांनी सांगितले.

तसेच 23 हजार 424 कैद्यांना आतापर्यंत कोरोना लस देण्यात आली, तर 3 हजार 660 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ कैद्यांची वेगळी व्यवस्था

60 वर्षापेक्षा जास्त वय अशलेल्या कैद्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे कैद्यांना भेटणे बंद केले आहे; मात्र,मोबाईलच्या माध्यमातून मुलाखती सुरू असल्याचेही रामानंद म्हणाले.

Advertisement

कोरोनाकाळात कारागृहात जी काळजी घेतली जाते, ती बाहेर घेतली जाणार नसल्यामुळे कारागृहाबाहेर जाण्यास ५३ कैदी नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले.

येरवडा परिसरात मोठं कारागृह उभारण्याचा प्रस्ताव

संसर्गजन्य आजार कायदा जोपर्यंत लागू आहे, तोवर बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्यांना बोलावले जाणार नाही. चार हजार 342 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

त्यापैकी 4 हजार 157 कैदी बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येरवडा परिसरात पाच हजार क्षमतेचे दुसरे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचेही रामानंद म्हणाले.

Advertisement

ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकमध्येही कारागृह टुरिझम

ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकमध्येही कारागृह टुरिझम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुलांना इतिहास समजावा या उद्देशाने कारागृह टुरिझममागचा हेतू आहे. मुंबईत आणखी एक कारागृह बांधले जाणार आहे.

त्याठिकाणी कच्चे कैदी ठेवले जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आला. हिंगोली, पालघर आणि गोंदियातही नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला. कारागृह भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. असे त्यांनी सांगितले.

Advertisement