पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सणासुदीसोबतच देशात करोना महामारीची लाट पुन्हा येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या (diwali) काळातच आली होती. सध्या रुग्णांमध्ये देखील चढ-उतार होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सणासुदीच्या काळात राज्यातील करोना रुग्णसंख्येत या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटी यांनी याबाबत पुष्टी करताना सांगितले की, राज्याने ओमायक्रॉनच्या एक्सबीबी प्रकारचा अहवाल दिला आहे. जो BA.2.75 पेक्षा घातक आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारा नवीन प्रकार आहे.

एक्सबीबी हा ओमायक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.1 या सबव्हेरिएंटचा हायब्रिड प्रकार आहे. जो ऑगस्टमध्ये सिंगापूरमध्ये शोधला गेला. या प्रकारामुळे तिथे करोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय कोविड-19 च्या विषाणूंची प्रकारणही महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. जे देशभरात अन्य ठिकाणी आढळलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे. असेच, दिवाळीच्या पार्श्ववभूमीवर काही निर्बंध देखील घातले आहेत.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी : 

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.
3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा
4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.
5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे
6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.

दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास करोना वाढणार नाही असं सुद्धा आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.