file photo

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात या नोटांची छपाई केली जात होती. या नोटा गुजरात राज्यातील नजीकच्या धरमपूर (जि. बलसाड) या तालुक्यातून चलनात आणल्या जात होत्या. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या १४८ बनावट नोटा जप्त केल्या असून, १३२ नोटा चलनात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुजरात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागातील गुही, मांधा आणि बोरचोंड या गावातील काही युवक या नोटा छपाईचे सूत्रधार असल्याचा संशय आहे. जयसिंग, हरिदास, अनिल (एकाचे नाव अजूनही समजले नाही) हे संगणकावर नोटांचे स्कॅनिंग करून त्याची कलर प्रिंट काढून घेत असत. चारशे रुपयांत पाचशेची नोट,

तर चाळीस रुपयांत पन्नासची नोट, याप्रमाणे नकली नोटा चलनात आणल्या जात होत्या. गुजरात राज्यातील पार्थ नीलेश शाह (रा. भूमी बंगला, धरमपूर जकात नाका), झिपर संता भोये (रा. मामा भाचे), चिंतू झिपर भुजड (रा. गडी), परशुराम मला पवार (रा. मुरदड) आदींना कमिशन तत्त्वावर नोटा चलनात आणण्याचे काम सोपविण्यात आले होते.

धरमपूर येथील जुन्या फळ बाजारात रिक्षाचालक झिपर भोये हा १२ जून रोजी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या हाती लागल्याने या रॅकेटचा भांडाफोड झाला. संशयित रिक्षाचालकाच्या ताब्यात ५०० च्या ६० बनावट नोटा आढळून आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलीस तपासात त्याने महाराष्ट्रातील सुरगाणा तालुक्यातून नोटांची छपाई केली जात असल्याची कबुली दिल्याने धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी या टोळीतील एका व्यापाऱ्यासह आठ जणांना ताब्यात घेतल्याचे बोलले जाते. त्यांच्याकडून पाचशेच्या १४८ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या टोळक्याने वितरीत केलेल्या १३२ बनावट नोटा अद्यापही चलनात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या नोटांची बँक अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून पडताळणी केली असता, त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुजरात सीमावर्ती भागात आदिवासी समाजात असलेले अज्ञान, तसेच आर्थिक दुर्बल परिस्थितीचा फायदा घेत या नोटांचे वितरण केले जात होते.

अटक केलेल्या संशयितांपैकी एकाची ऑटोरिक्षा, मोबाइल व महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी जप्त केले आहेत. या टोळीतील नोटांची छपाई करणारे सुरगाणा तालुक्यातील सूत्रधार अद्याप फरार असल्याचे कळते.