न्यायालयात आधीच लाखो प्रकरणे प्रलंबित असताना न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये चालणार असल्याने पक्षकारांत नाराजी आहे.

कामकाजाची वेळ कमी

कोरोना निर्बंधातून सूट देण्याबाबत ठरविण्यात आलेल्या स्तरांत बदल झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. एका आठवड्यातच कामकाजाची वेळ पुन्हा कमी केल्याने वकील आणि पक्षकारांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

तीनच तास काम

न्यायालयीन कामकाज सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. या काळात न्यायाधीश पूर्ण क्षमतेने तर ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामकाज चालेल, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

Advertisement

पुन्हा तारीख पे तारीख

न्यायालयाची वेळ कमी केल्याने नियमितची सुनावणी सुरू असलेल्या दाव्यांना पुढील तारखा मिळण्याची शक्यता आहे, तर महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढणार आहे, अशी भीती पक्षकार आणि वकिलांनी व्यक्त केली आहे.

वकिलांची आर्थिक कोंडी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज बदल होत आहे; मात्र वकील आणि पक्षकार कोरोना विषयक काळजी घेत आहेत. कामकाज बंद असल्याने दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

तसेच अनेक वकिलांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे न्यायालय एका सत्रात सुरू ठेवणे योग्य नाही, असे म्हणणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने मांडले आहे.

Advertisement