पुणे जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहे; तसेच दोन ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी न्यायालयाला सुटी असणार आहे.

न्यायालयांचे कामकाज तीन तास

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी याबाबतचे कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज तीन तास सुरू राहणार आहे. या काळात न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे.

पुढील आदेश येईपर्यंत नियम

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले आहेत; मात्र पुणे जिल्ह्यासह राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळे या जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.

तातडीच्या दाव्यावर फक्त कामकाज

न्यायालयीन कामकाजादरम्यान, रिमांड, जामीन आणि तातडीच्या फौजदारी व दिवाणी दाव्यांची सुनावणी होणार आहे. वकिलांना हे मान्य नाही.

पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी न्यायालयाचे कामकाज सुरू राहायला हवे. कारण त्या दिवशी कामाचा निपटारा होत असतो. त्यासाठी उच्च न्यायालयाला निवेदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वकिलांनी दिली.