श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील 25 वर्षांत आपले स्वरूप कसे असावे, याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली.

नीतीमूल्यांबाबत आपुलकी तयार करा

राज्यपाल कोश्यारी यांनी आज एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू येथील परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसेच प्राचार्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी व प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

शिक्षकांनी अध्यापन करताना मातृभाषा, भारतीय संस्कृती व नीतीमूल्य याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करावी, अशीही सूचना त्यांनी केली.

एसएनडीटीने महिलांच्या उत्कर्षासाठी काम करावे

जगात आज लिंगभेद समानतेचा (जेंडर इक्वॅलिटी) विचार होत असेल; परंतु भारताने त्याहीपुढे जाऊन स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केले आहे. धरणीमाता, जगन्माता जगाचे संचलन व परिपोषण करतात, हा भारताने दिलेला विचार आहे.

संस्थापक महर्षी कर्वे तसेच दानशूर ठाकरसी यांच्या योगदानाचा उल्लेख करून एसएनडीटी विद्यापीठाने स्त्री उत्कर्षासाठी सातत्याने काम करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Advertisement

विद्यापीठात साैरऊर्जा प्रकल्प

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाने जुहू येथे सौरऊर्जा प्रकल्प राबवून पारंपरिक ऊर्जेची बचत केली.

विद्यापीठात भारतातील पहिले महिला अध्ययन संशोधन केंद्र आहे तसेच गृहविज्ञान विषयाचे पहिले स्वायत्त महाविद्यालय असल्याचे कुलगुरू वंजारी यांनी सांगितले. निधीअभावी विद्यापीठ काही बाबतीत दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

Advertisement