नगरसेवकांवर गैरव्यवहाराचे व अन्य आरोप होत असतात; परंतु हितसंबंधासाठी नगरसेवक कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्या मनाप्रमाणे न वागणा-यांना नगरसेवक जीवनातून उठवू शकतात, हा अनुभव नवीन नाही. भाजपच्या नगरसेवकाने घर पाडण्याची धमकी वारंवार दिल्याने एका नागरिकाने आत्महत्या केली.

नगरसेवक पदाचा गैरवापर

घरावर बसविलेला मोबाईल टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने नगरसेवकपदाचा गैरवापर करून महापालिकेत अर्ज करून टॉवर पाडायला लावला. तसेच घरदेखील पाडून टाकणार अशी धमकी दिल्याने दत्तवाडीमधील संजय महादेव सुर्वे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

एप्रिलपासून त्रास

संजय महादेव सुर्वे (वय ५३, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (वय २६) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२१ पासून २१ जून २०२१ पर्यंत सुरू होता.

सुर्वे यांनी आपल्या दत्तवाडी येथील महादेव बिल्डिंगच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. ते दत्तवाडी प्रभाग क्रमांक २९ मध्ये राहत असताना त्याबाबत दत्तवाडी प्रभाग क्रमांक ३० चे विद्यमान नगरसेवक आनंद रिठे यांनी महानगर पालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैसे मागितले होते.

सुर्वे यांनी पैसे न दिल्याने रिठे यांनी महापालिकेत अर्ज करून त्यांच्या नगरसेवकपदाचा गैरवापर करुन १० जून रोजी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरील मोबाईल टॉवर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा आणून काढून टाकला.

Advertisement

तसेच टॉवरनंतर त्यांचे राहते घरदेखील पाडून टाकणार आहे, अशी धमकी देऊन आनंद रिठे यांनी सुर्वे यांना मानसिक त्रास दिला. रिठे यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून व टेरेसवरील मोबाईल टॉवर काढल्याने त्यांना मानहानी सहन झाली नाही.