घर खरेदीत दांपत्याची तब्बल ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम विकासकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वाकड पोलिसांना दिले. त्यानुसार विकासाकासह तिघांविरुद्ध आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ यानुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

अमर पाल सिंग (विकासक), सुधीर कुमार, प्रकाश मारुती डांबरे (रा. माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ, वारजे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी हर्षला राजेश पिल्ले (रा. पिंपळे सौदागर,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी अमर पाल सिंग याचा वाकड येथे ओमेगा पॅराडाइझ नावाचा गृहप्रकल्प आहे. त्यात सहाव्या मजल्यावर पिल्ले दांपत्याने सदनिका क्रमांक ६०९ आणि ६१० या कव्हर्ड पार्किंगसह ९६ लाख १२ हजार रुपायांना खरेदी केल्या होत्या.

Advertisement

त्यांनी ही रक्कम रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी विकासक सिंग याला दिली. त्याच्या पावत्याही घेतल्या. कोथरूड डेपोजवळील दुय्यम निबंधक, हवेली येथे दस्त नोंदणी होऊन खरेदी खत देखील झाले होते. दरम्यान, या गृहप्रकल्पाच्या बांधकामाला काही कारणांनी स्थगिती मिळाली.

त्यामुळे प्रकल्पाचे पुढील काम बारगळले. त्यामुळे फिर्यादींनी आरोपी सिंग यांच्याकडे दिलेली रक्कम परत मागितली. त्यावर सिंग याने फिर्यादीच्या नावाचे खरेदीखत रद्द करण्यास सांगितले. त्यांनतर या सदनिका अन्य ग्राहकाला विक्री करून ९६ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले.

तसेच दुसऱ्या ग्राहकांना कर्ज मंजूर व्हावे यासाठी दोन करेक्शन डीड बनविण्यास सांगितले. त्यानुसार राजेश यांनी करेक्शन डीड बनवून दिल्या. त्यानंतर सिंग याने सदनिका परत केल्याच्या बदल्यात राजेश पिल्ले यांना काही धनादेश दिले. मात्र ते धनादेश वटले नाहीत.

Advertisement

त्यामुळे सदनिकाही गेल्या आणि पैसेही, अशी अवस्था झाली, अशी माहिती हर्षला पिल्ले यांनी दिली. या प्रकरणी आरोपी सिंग, इस्टेट एजंट – ब्रोकर सुधीरकुमार आणि नोटरी करणारा प्रकाश डांबरे यांनी फसवणूक केल्याचे समोर आले.