कोरोनावरील ॲलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात चुकीच्या माहितीचा प्रसार केल्या प्रकरणी योगगुरू रामदेव यांच्याविरोधात येथील एका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) छत्तीसगड शाखेने बुधवारी रात्री रामकृष्ण यादव ऊर्फ बाबा रामदेव यांच्याविरोधात ॲलोपॅथीविरोधात अपप्रचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला अशी माहिती रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी गुरुवारी दिली.

रामदेवांवर भादंवि कलम १८८, २६९, ५०४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा -२००५ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत, असे ते म्हणाले. ‘आयएमए’च्या हॉस्पिटल बोर्डाचे (छत्तीसगड) अध्यक्ष डॉक्टर राकेश गुप्ता,

Advertisement

‘आयएमए’चे रायपूर अध्यक्ष तथा विकास अग्रवाल आदी अनेक डॉक्टरांनी यापूर्वी रामदेवांविरोधात तक्रार दाखल केली आहे. रामदेव गत वर्षभरापासून भारत सरकार व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोरोनावरील उपचारासाठी मान्य केलेल्या औषधींविरोधात अपप्रचार करत आहेत.

त्यांचे यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी व सरकारचे विविध विभाग व प्रशासन एकत्रितपणे कोरोनाचा निपटारा करण्यात व्यस्त असताना रामदेव सर्वमान्य उपचार पद्धतीविरोधात दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत,

असे या ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व ॲलोपॅथी औषधींमुळे ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झालेत. त्यामुळे रामदेव आपल्या विधानांतून लोकांचे प्राण संकटात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement