दौंड – दौंड -गोपाळवाडी रोड परिसरातील सरपंच वस्ती येथे थेट पोलिसालाच (police) मारहाण झाल्याची घटना घडली. महेश सदाशिव भोसले(पो. हवा.) यांनी या प्रकरणी फिर्याद (crime) दिली. ऋषिकेश उर्फ सोन्या सुरेश साळेकर(रा. सरपंच वस्ती ,दौंड), किरण आकडे(रा. बंगला साईड, दौंड) अशी गुन्हा (crime) दाखल आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि.24 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वा. दरम्यान येथील सरपंच वस्ती परिसरातील हॉटेल राजवाडा जवळ घटना घडली. दौंड पोलीस रात्रीच्या वेळेस गोपाळवाडी हद्दीत गस्त घालित होते.

त्यावेळी या ठिकाणी अंधारामध्ये पाच इसम रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून थांबलेले पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना, तुम्ही येथे का थांबला आहात अशी विचारणा केली असता आरोपी ऋषिकेश व किरण पोलिसांच्या अंगावर धावून गेले,

व तुला काय करायचे कर म्हणत त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी जाधव यांना दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच त्यांनी फिर्यादीला मारहाण करून दुखापत केली व तेथून फरार झाले.

दौंड पोलिसांनी दोन्ही आरोपीं विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे या कलमासह इतर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दौंड- गोपाळवाडी रोड परिसर दिवसेंदिवस अशांत होत चालला आहे. याआधीही या परिसरामध्ये चोऱ्यामाऱ्या,दरोडा, हाणामारी यासारख्या घटना घडल्या आहेत. या परिसरात पोलीस चौकीची मागणी वारंवारपणे होत आहे.

परंतु पोलीस चौकीला मुहूर्त सापडत नाही अशी परिस्थिती आहे. आता तर थेट पोलिसांनाच मारहाण झाल्यामुळे तरी या मागणीचा दौंड पोलीस प्रशासन गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.