बँकेचा लोगो वापरल्याने वाहिन्यांवर गुन्हा

नामांकित बँकेची परवानगी न घेता तिचा लोगो परस्पर एका वेब सीरीजमध्ये वापरणे वाहिन्यांना चांगलेच महागात पडले आहे. बँकेची बदनामी केल्याच्या आरोपावरून वाहिन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड अर्बन बँकेच्या लोगोचा गैरवापर

‘द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरीजमध्ये ‘दि कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँके’चा लोगो वापरून बदनामी केल्याच्या आरोपावरून सोनी लाइव्ह, ‘अप्लॉज इंटरटेन्मेंट’ व ‘यू-ट्यूब चॅनल’वर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बँकेचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र महादेव कांबळे (वय ५४, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सोनी लाइव्ह चॅनल्स अप्लॉज इंटरटेन्मेंट व दोन यू-ट्युब चॅनेलवर भारतीय दंड संहिता कलम ५००, ट्रेडमार्क अॅक्ट आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी

दि कराड अर्बन कोऑपरेटीव्ह बँक’ ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँक आहे. या बँकेचा लोगो ट्रेडमार्क कायद्यानुसार नोंदणी करण्यात आलेला आहे.

सोनी लाइव्ह अॅपवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरीजच्या तिसऱ्या भागात बँकेचा लोगो वापरण्यात वापरण्यात आला आहे.

सोनी लाइव्ह व अप्लॉज इंटरटेन्मेंट यांनी बेकायदा बँकेचा लोगो कॉपी करून त्याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला.

हा लोगो बँकेच्या परवानगीशिवाय वापरला. त्यामुळे बँकेच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचली. नऊ ऑक्टोबर २०२० रोजी ही वेबसीरीज प्रक्षेपित झाली होती; तसेच हर्षद मेहता प्रकरणाशी काहीही संबंध नसताना बँकेचा लोगो वापरण्यात आला आहे.

त्यामुळे बँकेला आर्थिक व सामाजिक मनस्तापाला सामोरे जावे लागले; तसेच या व्यतिरिक्त दोन यू-ट्युब चॅनलनेदेखील बँकेचा लोगोचा व्हिडिओसाठी वापर केला असल्याचे दिसून आले आहे, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.