पावसाने दडी मारल्याने शेतक-यांसमोर संकट

राज्याच्या ब-याच भागांत गेल्या दीड महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं आणि अजून किमान दहा दिवस तरी पाऊस होण्याची शक्यता नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

चिंता वाढली

राज्यात पावसाने दडी दीर्घकाळ दडी मारल्यामुळे सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

सध्या माॅन्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे दहा जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील.

त्यानंतर १५ जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; मात्र त्यामुळे पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.

मुंबईतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

जून महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे.

त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे; मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय कमी गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीमध्ये 31 टक्के पेरण्या

खरीप हंगामातील 31 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे 1 लाख 84 हजार 278 हेक्टर क्षेत्र आहे.

आतापर्यंत 57 हजार 557 क्षेत्रातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; मात्र पाऊस नसल्याने या पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

जुलै महिना उजाडला तरी अकोला जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे.

अकोला जिल्ह्यात अद्याप सत्तर टक्के क्षेत्रात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.