राज्य सरकारने दहा दिवस राबविलेल्या कृषी संजवनी मोहिमेची आज सांगता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
सहा लाख शेतक-यांचा सहभाग
या मोहिमेत सुमारे 40 हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे 6 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलैपासून ही मोहीम राबविली जाते; मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरू झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन या वर्षी 1 जुलैपूर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला. दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विविध विषयांवर मार्गदर्शन
मोहिमेच्या पहिल्या दिवशी बीबीएफ लागवड तंत्रज्ञानविषयी 5 हजार 564 गावांमध्ये कार्यक्रम झाला. त्यामध्ये 84 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बीजप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी 5 हजार 671 गावांमध्ये कार्यक्रम घेऊन 88 हजार 727 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
5 हजार 457 गावांमध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये 88 हजार 670 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बीया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञानाबाबत 4 हजार 699 गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्या माध्यमातून 78 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.