पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक (dagdusheth ganpati visarjan) अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये ‘दगडूशेठ’ (dagdusheth ganpati visarjan) चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा (dagdusheth ganpati visarjan) श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला आहे.

श्री स्वानंदेश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर ५ कळस बसविण्यात आले आहेत.

एलईडी व मोतिया रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध रंगाचे एलईडी लाईटस् देखील वापरण्यात आले आहे.

दाक्षिणात्य पद्धतीची रचना हे यंदाच्या रथाचे वैशिष्टय आहे. संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले आहेत.

यावेळी मिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन असणार आहे. त्यामागे पुण्यातील जगप्रसिद्ध व महत्वाच्या ठिकाणाची चित्रे असलेला व स्वच्छतेचा संदेश देणारा

‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ असणार आहे. त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली आहेत.

याखेरीज मिरवणुकीत स्व-रूपवर्धिनी पथक, दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह असा लवाजमा असेल. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.