पुणे – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळावा कोण घेणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

दरम्यान, आज संध्याकाळी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे हे दोघेही दसरा मेळावा घेणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वी काही टीझर लाँच झाले असून सध्या दोन्ही गटांचे हे टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाला. त्यानंतर होणारा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे यंदाच्या या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मात्र, शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर (Eknath Shinde Dasara Melava) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी जोरदार टीका केली आहे.

“अमित शहांच्या (amit shah) ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात दानवे यांनी एकनाथ शिंदेवर घणाघाती टीका केली आहे.

आमचा दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत हे या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असं दानवे म्हणालेत.

एक दिवस भारतीय जनता पार्टीच या गद्दारांना मातीत मिसळवणार आहे, असंही दानवे म्हणाले आहेत. आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सगळ्याचं लक्ष आहे. अशात दानवेंनी हा शाब्दिक हल्लाबोल केला असून, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.