ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

वित्तीय कंपन्यांच्या ‘गुंडाराज’ ला कर्जदार वैतागले

टाळेबंदीच्या काळात बंद पडलेले व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची नंतरच्या टाळेबंदीनं परतफेड करण्यात अडचण आली आहे; परंतु ही अडचण समजून न घेता कर्जदारांना शिव्या, जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत वित्त पुरवठादार कंपन्या करायला लागल्यानं कर्जदार भीतीच्या छायेखाली आहेत.

गुंडगिरी करणा-यांना नाही राहिला धाक

गेल्या वर्षी टाळेबंदीत बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. पुन्हा टाळेबंदी लागल्याने कर्जाचे काही हफ्ते थकले.

त्यानंतर संबंधीत फायनान्स कंपनीने नेमलेल्या रिकव्हरी एजन्सीच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती घरी येऊ लागल्या. शिवीगाळ, धमकाविण्यापासून ते जीवे मारण्याची धमकी ते देतात.

त्यांना पोलिसांचा धाक नाही. त्यांच्याकडून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, पण न्याय कुठे मिळेल ? असा सवाल एका कर्जबाजारी नागरिकानं केला आहे.

कर्जदारांना अपमानास्पद वागणूक

मुलांचे शिक्षण, घर बांधणी, सदनिका किंवा वाहन खरेदी, कुटुंबीयांचे आजारपण, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणांसाठी नागरिकांकडून एखादी वित्तीय संस्था, खासगी सावकार किंवा पतसंस्थेकडून झटपट कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

त्यांना काही दिवसांतच कर्ज मिळते. कर्जाचा हप्ता वेळेत जाईपर्यंत नागरिकांना अडचण येत नाही; मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे कर्जाचे हप्ते थकण्यास सुरुवात झाल्यानंतर संबंधित फायनान्स कंपन्या, त्यांच्या रिकव्हरी एजन्सीकडून नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात करतात.

प्रारंभी फोनवरून नागरिकांशी उद्धटपणे व अर्वाच्य भाषेत बोलण्यापासून ते त्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत संबंधित व्यक्तींची मजल जाते.

केवळ तेवढ्यावरच न थांबता कर्जदाराच्या घरी जाऊन, त्यांच्या शेजाऱ्यांसमोर त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली जाते. या सगळ्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

व्यवसाय, रोजगार गेला आणि त्रास वाढला

एकीकडे कोरोनामुळे नागरिकांच्या हातचे रोजगार, व्यवसाय गेले आहेत. त्यामुळे नागरिक अगोदरच हतबल झाले आहेत. अनेकांना कुटुंबांचा दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होत आहेत.

अशातच रिकव्हरी एजन्सीच्या लोकांकडून दररोज होणाऱ्या त्रासामुळे नागरिक कंटाळले आहेत. स्वतःसह कुटुंबाच्या जिवाला धोका असल्यामुळे पोलिसांकडेही जाण्यास ते धजावत नाहीत.

 

You might also like
2 li