Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पर्यटनस्थळी वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय

प्रशासनाने निर्बंध लादूनही पर्यटक दाद देत नसल्यानं आता जुन्नर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पर्यटकांच्या वाहनांना एक किलोमीटर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव

पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पर्यटन तालुका आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात; मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, तरीही गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते.

वारंवार आवाहन करूनही नागरिक गर्दी करत असल्याने जुन्नरमधील पर्यटनस्थळी कलम 144 लागू करण्यात आले आहे. धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

पर्यटकांना काय करण्यास मज्जाव ?

वेगाने वाहणाऱ्या किंवा खोल पाण्यात उतरणे, त्यात पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, अशा प्रकारांना बंदी लावण्यात आली आहे.

कोणकोणत्या पर्यटनस्थळी नियम लागू ?

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट, दारे घाट, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहणार आहेत.

प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे स्थानिक पोलिस प्रशासन व जुन्नर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

 

Leave a comment