दोन दिवसांवर बकरी ईद आली असून, तिच्यासाठी दुकाने सज्ज झाली आहेत. बकरी ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

रस्त्यावर हंगामी विक्रीची दुकाने

बकरी ईद हा मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा पवित्र सण. हा सण साजरा करण्यासासाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक घरात तयारी सुरू आहे.

त्यासाठी सय्यदनगर कोंढवा परिसरात छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने सजली आहेत. कोरोनाच्या सावटामुळे बकरी ईद एकत्र येऊन साजरा करता येणार नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने तो घरोघरी साध्या पद्धतीने केला जाणार आहे.

त्यासाठी घराघरातून खरेदी होताना दिसते. व्यावसायिकांनी त्यासाठी फळे, कपडे, शेवई, मेहंदी, बांगड्या, मिठाई याची रस्त्यावर हंगामी विक्रीची दुकाने थाटली आहेत.

व्यवसायावर परिणाम

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा हा सण साध्या पद्धतीने साजरा होत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणीवर परिणाम झाला आहे.

सणामध्ये चांगला व्यवसाय होत असतो; परंतु गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही त्यामध्ये मोठी घट झाली असल्याचे शेवई व कपडे विक्रेते रिहान शेख, शकील शेख यांनी सांगितले.

गरीबांना करा मदत

माजी नगरसेवक फारूख इनामदार म्हणाले, “हा सण पवित्र व दानधर्माला महत्व देणारा आहे. तीन दिवस हा सण घराघरात श्रद्धेने साजरा केला जातो. प्रत्येकाने गरीब नागरिकांना मदत करून, एकमेकांशी प्रेमभाव ठेवत संयमाने सण साजरा करावा.