पुण्यासह परिसरात सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे; परंतु असे असतानाही धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘डीएसके विश्व’ला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टँकरवर ३० लाख रुपये खर्च

गेल्या महिन्यात धायरी आणि ‘डीएसके’चा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला १६ इंची अतिरिक्त वाहिनी जोडण्यात आली होती.

त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; मात्र ‘डीएसके’मधील नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी विकतचे टँकर घ्यावे लागत आहे. दर वर्षी ‘डीएसके’ला पाण्याच्या टँकरवर ३० लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.

Advertisement

पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित

धायरी येथील ‘डीएसके विश्व’ सोसायटीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. आतापर्यत नऊ सोसायटीधारकांनी ७० पाण्याचे टँकर मागवले आहेत. अजूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे.

ऐन पावसाळयात आणि धरण भरून वाहत असतानाही या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण कशी झाली, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारले असता सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे; परंतु सध्या धायरी परिसराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे ‘डीएसके विश्व’ला कमी प्रमाणात पाणी सोडले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

Advertisement

अतिरिक्त पाणी जाते तरी कुठे ?

गेल्या महिन्यात धायरी आणि ‘डीएसके’ला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वहिनीला १६ इंची अतिरिक्त वाहिनी जोडण्यात आली होती. त्यामुळे धायरी आणि परिसराला जादा पाणीपुरवठा अपेक्षित असताना उलट निम्म्या परिसरात पाणी कमी पडत आहे.

त्यामुळे अतिरिक्त पाणी जाते तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे येथील नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेने यावर ठोस उपायोजना करून त्वरित ‘डीएसके विश्व’चा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Advertisement