तथाकथित अध्यात्मिक गुरूवर जादूटोणा कायद्यानुसार कारवाईची मागणी

महिलेला पांढ-या पायाची आहे, तिला सोडून दे, तरच तू आमदार होशील, असा सल्ला देऊन महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करायला भाग पाडलेल्या तथाकथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून, कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

बाबाच्या सांगण्यावरून छळ

येमुलने पुण्यातील एक उच्च शिक्षित पीडित महिलेसोबत जादूटोण्याचा प्रकार केला. या बाबाच्या सांगण्यावरुन पती आणि कुटुंबीयांनी पीडित महिलेचा छळ केला.

त्यामुळे तथाकथित गुरू आणि अन्य आरोपींविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शिवाजीनगर शाखेने केली आहे.

पोलिस ठाण्यात गुन्हा

पीडित महिलेला नवरा, सासू-सासरे, नंदन-त्यांचे पती आदींनी मानसिक, शारीरिक, लैंगिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केल्यासंबंधी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे; मात्र हे प्रकरण बारकाईने पहाता कथित गुरूसह अन्य आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्यांतंर्गत गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

“तुझी बायको अवदसा असून पांढऱ्या पायगुणाची”

“कथित गुरू रघुनाथ येमुल यांनी संबंधित महिलेच्या पतीला ”तुझी बायको अवदसा असून पांढऱ्या पायगुणाची आहे. तिची जन्म वेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान चुकीचे झाले आहे.

जर तुझी ही बायको म्हणून तशीच राहिली, तर तू आमदारही होणार नाहीस आणि मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून ताब्यात घे.

तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पीडा कायमची निघून जाईल”, असं सांगितल्याची माहिती विशाल विमल यांनी दिली.

सिगारेटचे चटके, मारहाण

विशाल विमल म्हणाले, “कथित गुरूंनी सांगितल्याने कुटुंबीय, नातेवाइक आदींनी पीडित महिला झोपलेल्या ठिकाणी हळदी, कुंकू, टाचण्या, लिंबू आदींद्वारे जादूटोणा प्रकार केला.

त्यामुळे पीडित महिलेच्या मनात भीती निर्माण करून त्रास देण्याचा प्रकार झाला. संबंधित महिलेला सिगारेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केलेली आहे.

या महिलेबाबत ज्या गोष्टी घडल्या त्या जादूटोणा विरोधी कायद्यात गुन्हा म्हणून नमूद आहेत. त्यामुळे संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी.”