पूर्व हवेलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रत्येक गावात कोरोना रुग्ण वाढत होते. त्यात या आठवड्यात त्याच्या प्रमाणात घट झाली. एप्रिल तसेच मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरोग्य विभागाकडून लसीकरणाचा वेग वाढविला होता.

परंतु, मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. तरी, लसीकरण त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी आळंदी म्हातोबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली जवळकर यांनी केली.

पूर्व हवेलीतील गावांमध्ये अजूनही पंचेचाळीस वर्षांच्या पुढील नागरिकांचे पहिले डोस काही प्रमाणात बाकी आहेत. पहिला डोस घेऊन सहा आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस दिला जात होता.

Advertisement

लसीच्या तुटवड्यामुळे यात बदल करून पहिला डोस बंद करून फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू होते; परंतु कालांतराने यात शासनाच्या नवीन नियमानुसार दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवून ते बारा आठवडे करण्यात आले.

दरम्यान, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कुंजीरवाडी आरोग्य केंद्रांर्तगत येणाऱ्या गावांमधील ज्येष्ठ नागरिक तसेच पंचेचाळीस वर्षांच्या पुढील राहिलेल्या नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण होऊन प्रत्येक गावातील पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.

त्यामुळे शासनाने आरोग्य केंद्रांना लसपुरवठा करून लसीकरण सुरू केले पाहिजे, अशी मागणी आता प्रत्येक गावात जोर धरत आहे. लसीकरणाच्या पहिल्या डोसपासून वंचित राहिलेले नागरिक लसीकरण केंद्रावर रोज चकरा मारत आहेत; परंतु लसीकरण बंद असल्याने त्यांना परत जावे लागत आहे.

Advertisement

कोरोनाचा वाढता धोका तिसरी लाट येण्याअगोदर लसीकरण व्हावे यासाठी नागरिक मात्र लसीकरण केंद्रावर फेऱ्या मारत आहेत, परंतु लसी मिळत नाही अशी विदारक स्थिती ग्रामीण भागात आहे. तरी शासनाने तत्काळ राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.