माउलींचं प्रस्थान आणि १७ दिवसांचा मुक्काम

अवघ्या भक्तीरसानं न्हाऊन निघालेला परिसर..ज्ञानोबा-तुकोबाच्या शिगेला पोचलेला गजर…देहभान हरपून नाचणारे वारकरी…टाळ, मृदंगाचा आवाज…सोबतीला माउली, माउलीचा जयघोष…असं वातावरण आळंदीत होतं. निमित्त होतं, पालखी प्रस्थान सोहळ्याचं.

शंभर वारक-यांना परवानगी

मंदिर प्रदक्षिणा करून माउलींच्या पादुका आजोळघरी सतरा दिवसांसाठी मुक्कामी विसावल्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे.

तसेच प्रस्थान सोहळ्याला शंभर वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. तसेच दर्शनासाठी साडेतीनशे दिंड्यांच्या प्रतिनिधींना परवानगी दिली.

माउलींचे लोभस रुप

शुक्रवारी पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर दुपारी साडे बारा वाजता माउलींना नैवेद्य दाखविण्यात आला. समाधी दर्शन पूर्णतः बंद होते. दुपारी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.

समाधी मंदिरात अकरा ब्रम्हवंदांनी माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवला. गळ्यात तुळशीहार आणि गुलाबपुष्पाचा हार घालून डोक्यावर चांदीचा मुकुट ठेवून सजविली. ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोष सुरू होता.

माउलींचे लोभस रूप डोळ्यात साठवीत भाविकांनी हरिनामाचा गजर केला. आकर्षक फुलांची सजावट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या होत्या. चार वाजता दिंड्यांतील प्रतिनिधींना मंदिरात सोडण्यास सुरूवात झाली.

चोपदार बंधूंच्या मदतीने पोलिस वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देत होते. मानाच्या अश्वांचा पाच वाजता मंदिरात प्रवेश केला.

मानक-यांना नारळ

मुख्य गाभाऱ्यात हैबतबाबा यांच्या वतीने मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या वतीने आणि देवस्थानच्या वतीने मानाची आरती झाली. देवस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला.

पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, खासदार संजय जाधव, जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे आदी उपस्थित होते.

आरफळकर आणि देवस्थानच्या वतीने दिंडीप्रमुख आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर संस्थानच्या वतीने दिंडीकरी, फडकऱ्यांना पागोटे वाटप केले.

पादुका १९ जुलैपर्यंत आजोळघरीच

माउलींचे मानाचे अश्व आणि ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि त्यांचे कर्मचाऱ्यांचा मुक्काम १९ जुलैपर्यंत आळंदीत असणार आहे, तर माउलींच्या चल पादुकाही आजोळघरात मुक्कामी आहेत. वारीच्या वाटेवरील कीर्तन, प्रवचन, जागराच्या सेवा आजोळघरी प्रतिनिधिक स्वरूपात केल्या जातील.