Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान

सासवड : सासवड येथील देऊळवाड्यात व संत सोपानदेवांच्या मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.

समाधीवर पहाटे स्नान पूजा, अभिषेक झाला. सारा उत्साह व उत्सवी थाट असला, तरी कोरोना नियम पाळून सारे दरवाजे बंदीस्त ठेवून पोलिस बंदोबस्तात प्रस्थान सोहळा रंगला.सलग दुस-या वर्षी कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान झाले.

वारीला घालावी लागली मुरड

टाळ – मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या – वारकरी यांची उत्साही उपस्थिती.. ढगाळ वातावरण व मंद वा-यायाच्या झुळका अंगावर झेलत… लोकरंग व भक्तीरंगात संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीच्या आषाढवारीचा प्रस्थान सोहळा आज भक्तीमय झाला.

खरे तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील लाखभर वारकरी सोपानदेवांना पंढरीकडे निरोप देण्यासाठी असतात; मात्र यंदा दुस-या वर्षी कोरोना नियम पाळून वारीला मुरड घालावी लागली आहे.

मान्यवरांची मांदियाळी

या वर्षीही शासन आदेशानुसार पायी वारीला परवानगी नसल्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे बसमधूनच निवडक वारकरी संत सोपानदेवांच्या पादुका घेऊन आषाढवारी करतील.

त्यासाठीचा प्रस्थान सोहळा देऊळवाड्यात झाला, असे संत सोपानदेव समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी सांगितले.

या वेळी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत,

पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, राहुल घुगे, गट विकास अधिकारी अमर माने, नगरसेवक अजित जगताप, प्रवीण भोंडे, सुनीता कोलते, विश्वजीत आनंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

१८ तारखेपर्यंत पालखी सासवडमध्येच

मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरातच विसाव्याला थांबली. जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात असेल व या दरम्यान नित्य उपचार म्हणजे काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन सेवा, शेज आरती व जागर मंदिरातच होईल.

शक्यतो वारी वाटचालीमध्ये ज्या दिंड्यांच्या कीर्तन सेवा व इतर सेवा आहेत, त्यांच्याकडून या सेवा घडतील. त्यानंतर म्हणजे आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजे 19 जुलै रोजी

शासनाकडून पुरविलेल्या दोन एसटीमधून श्रींच्या पादुका पंढरीकडे प्रत्यक्ष प्रस्थान (वाटचाल) करतील. एसटी बसेस फुलांनी सजवण्याचे काम गेल्यावर्षी प्रमाणे संत सोपानकाका बँक करणार आहे.

Leave a comment