आषाढी वारीचे वेध लाखो भाविकांना लागतात. तसे ते यंदाही लागले आहेत. कोरोनामुळे मर्यादित वारक-यांना वारीत सहभागी होता येणार असले, तरी परंपरेप्रमाणे उद्या पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे.

मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण

संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होणार आहे.

शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या चांदीच्या पादुका मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहेत.

Advertisement

तत्पूर्वी माउलींचे मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण केले असून प्रस्थान संबंधित वारकऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

होणारे विधी

माउलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शुक्रवारी पहाटे चार ते साडेपाच वाजता माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल.

दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माउलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर सायंकाळी चार वाजता प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल.

Advertisement

मोजक्या ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.

आजोळघरात माउलींचा १७ दिवस मुक्काम

देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात देऊन मुख्य मंदिरातून चलपादुकांचे प्रस्थान होईल.

वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ – मृदुंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर विराजमान केल्या जातील.

Advertisement

आजोळघरातच माउलींचा सतरा दिवस मुक्काम असणार आहेत. याठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दैनंदिन कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम होईल.

वारकऱ्यांची कोरोना चाचणी

आळंदी येथून उद्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात निमंत्रित वारकरी आणि ट्रस्टी यांना परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला १९ जुलैला माउलींच्या चलपादुका लालपरीतून पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. दरम्यान, अलंकापुरीत संचारबंदी लागू असल्याने समाधी मंदिर बंद आहे.

Advertisement