Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

शिवाजी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान

गेल्या सात वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या पादुका आषाढी वारीतील पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. आताही या पादुकांचे पूजन करून त्या रायगडकडे रवाना झाल्या.

सोहळ्याचे सातवे वर्ष

शिवनेरी किल्ल्याहून अगोदर रायगड व नंतर या पादुका आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. आज पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे किल्ले शिवनेरीहून रायगडच्या दिशेने प्रस्थान झाले.

शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.

Advertisement

पाचच शिवभक्त सहभागी

शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणेमार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर गडावर विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ पाचच शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुकांची प्रस्थान पूजा करून जुन्नरहून निघाले.

शक्ति परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी शिवनेरीहुन संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात.

राज्याभिषेकापासून पुढील पाच दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभरासाठी पादुका शिवजन्मभूमीत परत येतात.

Advertisement

यांचा सहभाग

कोरोनामुळे शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी या वर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ॲड. भाऊसाहेब शिंदे, ॲड. राहुल कदम, साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे.

कोरोनाचे नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, नेत्राली ताजणे, संतोष परदेशी, कल्पेश परदेशी, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुर्हे, सुशांत शिंदे, सूरज खत्री यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Leave a comment