व्यापक जनहित लक्षात घेऊन आणि सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेशदेखील काढला आहे. वारी आणि वारकरी समाजाबाबत आम्हाला आदर व प्रेमच आहे.

परंतु, सध्याची कोरोना परिस्थितीदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या वारीइतके कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता त्यात मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

Advertisement

पवार म्हणाले, पायी वारीबाबत निर्णय घेण्याआधी देहू, आळंदीसह इतर मानाच्या प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वारी सोहळ्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यास सांगितले आहे.

या वेळी लोकप्रतिनिधी, प्रशासन यंत्रणा किंवा वारी मार्गावरील ग्रामस्थांनी कोरोना परिस्थितीमुळे पायी वारी सोहळ्याऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बसने वारी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच, पंढरपूरमधील प्रशासन यंत्रणांनीदेखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस झालेल्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.

Advertisement