पुणे जिल्हयाने कोविड लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा पार केला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे.

निष्कारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील काैन्सिल हॉलमध्ये पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी पवार बोलत होते.

Advertisement

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीश बापट, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील कांबळे, आमदार दिलीप मोहिते, आमदार राहुल कुल तसेच यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, टास्क फोर्सचे डॉ. दिलीप कदम आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नियमांत जराही कुचराई नको

पोलिस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. पुणे जिल्हियात मृत्यूदर कमी झाला आहे; मात्र नागरिकांनी मास्क वापरण्याची नितांत गरज आहे.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतले, तरी सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबतही दक्षता घ्यावीच लागणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे.

Advertisement

नियमांच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

संसर्ग रोखा

कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांवर काटेकोर कारवाई करावी.

त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश पवार यांनी आज दिले.

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Advertisement