राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. देशमुख आणि परब एक दिवस तुरुंगात असतील, असे ते म्हणाले.

देशमुख यांची आणखी मालमत्ता सापडेल

देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे.

देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईवरून सोमय्या यांनी देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

Advertisement

त्याचबरोबर त्यांनी पवार, ठाकरे आणि परिवहन परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देशमुख यांची 2010ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे.

आता हळूहळू 2020 आणि 2021 ची मालमत्ताही सापडेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

देशमुख यांनी काळा पैसा गुंतवला कंपन्यांत

देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे.

Advertisement

सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंह, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा, असा दावा त्यांनी केला.

इतकंच नाही तर देशमुख आणि परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

देशमुखांना सर्वोच्च न्यायालय हाकलून देणार

देशमुख सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील; मात्र सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिल्यानंतर त्यांना ‘ईडी’कडेच जावं लागणार आहे.

Advertisement

उच्च न्यायालयानं तपासाची व्याप्ती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे राज्य सरकार, देशमुख रोज एक पिटीशन टाकत आहेत आणि तपास थांबवा असं सांगत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

देशमुखांची कोणती संपत्ती जप्त?

देशमुख यांच्या वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत एक कोटी 54 लाख रुपये आहे.

दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

या जमिनीची किंमत दोन कोटी 67 लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे.