file photo

मुंबई: ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी छापे टाकल्यानंतर त्यांना ईडी अटक करण्याची शक्यता आहे.

त्यासाठी त्यांना समन्सही बजावले; परंतु आरोपाची माहिती दिल्याशिवाय ईडीसमोर हजर राहायला देशमुख यांनी नकार दिला आहे

वकील हजर

देशमुख यांना खंडणी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते; पण सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देशमुख ईडी कार्यालयात हजर न राहता त्याजागी त्यांच्या वकिलांनी कार्यालयात हजेरी लावली.

Advertisement

देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. त्यांना नीट रितसर माहिती दिली जावी आणि पुढील वेगळी तारीख दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र ईडीला देण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.

आरोप चुकीचे

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे देशमुखांना ईडीचा सामना करावा लागतो आहे. त्याच प्रकरणात ईडीने चौकशीसाठी देशमुखांना बोलावले होते. देशमुख यांच्या वकिलांनी दिलेल्या पत्रात लिहिले आहे, की माझा जबाब काल ईडीने नोंदवून घेतला.

माझे वय ७२ वर्षे असून मी अनेक सहव्याधींनी ग्रस्त आहेत. काल माझी जी चौकशी झाली, त्यामुळे मला खूप थकवा जाणवतो आहे.

Advertisement

तसेच, ज्या केसबद्दल माझी चौकशी करण्याचा विचार आहे, तिच्याशी माझा संबंध नसून माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

तपास यंत्रणेकडून दबाव

“आम्ही ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. ईडीने ज्या संदर्भात समन्स बजावले आहे, त्याची कोणतीही कागदपत्रे ईडीकडून आम्हाला देण्यात आलेली नाहीत.

त्यामुळे कोणत्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशी केली जाणार आहे, ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. आम्हाला याची नीट रितसर कल्पना नाही.

Advertisement

केंद्रीय तपास यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दबाव टाकला जात आहे. आम्ही त्यांच्याकडून ईडीकडून अधिकची माहिती आणि चौकशीसाठी पुढील तारीख मागितली आहे”, अशी माहिती अॅड जयवंत पाटील यांनी दिली.