माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिस अधिका-यांच्या बदल्याशी संबंध होता. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल झाली, असा आरोप ईडीने केला. स्वीय सचिव संजीव पलांडे याच्या जबाबातूनही ही बाब पुढे आली आहे.

पोलिस अधिका-यांच्या बदल्यांची चाैकशी शक्य

‘माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याची १५ वर्षांनंतर पुन्हा करण्यात आलेली नेमणूक आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या याविषयी चौकशी होणे आवश्यक आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा संबंध होता, हे त्यांचा स्वीय सचिव संजीव पलांडे याच्या जबाबातून समोर आले आहे.

Advertisement

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी अनधिकृत यादी बनवण्यात आली होती आणि त्याबाबत बैठक झाली होती, असेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे याविषयी अधिक चौकशीसाठी पलांडे तसेच देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे यांची आणखी कोठडी हवी आहे’, असे म्हणणे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयासमोर मांडले.

खंडणीची रक्कम वळविली विविध कंपन्यांत

मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून अनिल देशमुख यांना चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आणि ती त्यांच्या विविध संस्था व बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आली, असा आरोप ईडीने केला आहे.

देशमुख यांच्यासह पलांडे व शिंदे यांच्या निवासस्थानी छापे घातल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पलांडे व शिंदे यांना २६ जून रोजी अटक केली. दोघांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना गुरुवारी न्या. एस. एम. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले.

Advertisement

न्यायालयही अधिक चाैकशीच्या बाजूने

‘तपास संस्थेकडे कोणतेही ठोस पुरावे नसून केवळ सांगोवांगी माहितीच्या आधारे आरोपींना गुंतवण्याचे प्रयत्न होत आहेत. कपोलकल्पित कहाणी रचून न्यायालयात सांगितली जात आहे’, असा युक्तिवाद करत अॅड. मेहुल ठक्कर व अॅड. शेखर जगताप यांनी आरोपींतर्फे ईडीच्या विनंतीला विरोध दर्शवला.

मात्र, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता आणि सचिन वाझे व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्याची तपास यंत्रणेची विनंती पाहता आरोपींच्या अधिक चौकशीची संधी ईडीला देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने कोठडीत वाढ केली.

पलांडेकडून महत्त्वाची माहिती

देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे चौकशीत सहकार्य करत नसून प्रश्नांना अस्पष्ट उत्तरे देत आहे. गुन्ह्यातील रक्कम कुठे गेली याविषयी दोघांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. संजीव पलांडेकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली असून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवणे गरजेचे आहे.

Advertisement

तसेच अन्य तपास यंत्रणांकडे असलेले कॉल रेकॉर्ड व अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळवून त्याआधारेही आरोपींची चौकशी करणे आवश्यक आहे’, असे म्हणणे ईडीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले.

 

Advertisement