जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 336 व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त मंदिराच्या आवारात पहाटेपासून उत्साहाचे वातावरण आहे.

प्रस्थान पूर्व धार्मिक कार्यक्रमांना अत्यंत उत्साही आणि आल्हाददायक अशा वातावरणामध्ये टाळ -मृदंगाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात झाली.

ज्ञानेश्वर, तुकारामांचा गजर

मंदिरात हरिनामाचा गजर चालू आहे. संत ज्ञानेश्वर – तुकारामांच्या नामस्मरणात परिसर दुमदुमून गेला आहे. मर्यादित वारकऱ्यांनाच कीर्तन सोहळयाला परवानगी देण्यात आली आहे. देहूतील स्थानिक नागरिक मंदिरबाहेरून दर्शन घेत आहेत.

Advertisement

कीर्तन संपल्यानंतर पादुका भजनी मंडपात सेवेकरी सुनील सोळंके गंगा मसलेकर हे डोक्यावर घेऊन येणार आहेत.

पहाटे चार वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. शिळा मंदिरात सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

पादुकांना चकाकी

राम मंदिरातील महापूजा विश्वस्थ विशाल महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

Advertisement

पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा संजय महाराज मोरे माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली व वैकुंठगमण मंदिरातील महापूजा अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी येथील घोडेकर सराफ यांनी मंदिराच्या आवारात पादुकांना चकाकी दिली.

गावात संचारबंदी तर सर्व सीमा बंद

गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. गावात संचारबंदी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. गावाच्या सर्व सीमा बंद केलेल्या आहेत. वाहतूक बाह्यवळणमार्गाने वळविण्यात आलेली आहे.

स्थानिकांना सोडून इतर वाहनांना व भाविकांना प्रवेश दिला जात नाही. पास धारक वारकरी व त्यांच्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे. महाद्वारात रांगोळी घातली आहे.

Advertisement