Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पैसे खाल्ले तेव्हा देशमुखांना कोरोना नव्हता का ? दमानिया

“आता अनिल देशमुख यांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ईडीने बिलकुल अपवाद करू नये. कायदा सर्वांना सारखाच असतो. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा?

भाजपची ही चाल आहे; पण तुमचे हातदेखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देशमुख यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.

जबाब व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे घ्या

‘ईडी’ने देशमुख यांना शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावले. शनिवारी देशमुख यांनी वेळ मागितल्यामुळे त्यांना आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते; पण आजदेखील देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

त्यांनी ईडीला पत्र लिहून, त्यांची चौकशी किंवा जबाब हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नोंदवून घ्यावा अशी विनंती केली.

चाैकशीला का हजर राहू शकत नाही ?

तपासादरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आल्याचे सांगून कोरोनाचे कारण देत त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणे टाळले. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुख यांनी सवाल केला.

माझी २५ जूनला दीर्घ काळ चौकशी झाली आहे. माझं वय ७२ वर्षे आहे. मला अनेक शारीरिक व्याधी आहेत. कोमॉर्बिलीटीमुळे मला काळजी घेणं गरजेचं आहे.

तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कातही आलो आहे. त्यामुळे मी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने मी चौकशीसाठी स्वत: हजर राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a comment