काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना धुळ्याचा दाैरा अर्धवट सोडून दिल्लीला बोलावल्याने राज्याच्या काँग्रेसमधील घडामोडींना गती आली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी बैठक महत्त्वाची

काँग्रेसची महत्त्वाची बैठक असल्यानं पटोले यांना तातडीनं दिल्लीला बोलवण्यात आलं असल्याची चर्चा आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन पाच जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाहीये. त्या पार्श्वभूमीवर पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावल्याचं समजतं. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

राऊत यांचं मंत्रिपद पटोलेंकडे ?

पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते पटोले यांना मिळणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळं उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबत काही निर्णय होणार का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

स्वबळाचा मुद्दा ?

पटोले यांनी आगामी निवडणुकाची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील काँग्रेसचे कान टोचले होते.

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं स्वबळाच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा होणार का अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.