ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आहेराच्या खर्चातून फुटपाथवरील कुटुंबाना धान्यवाटप

कोरोनामुळे लग्नाचा खर्चा वाचतो आहे. त्यामुळे वाचलेल्या खर्चातून अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. असाच प्रकार मुंबईत घडला आहे. लग्नात आहेर मागवून घेऊन, त्याचा उपयोग साठ कुटुंबीयांना धान्यदानासाठी करण्यात आला.

वरातीचा खर्चही पदपथावरील लोकांसाठी

इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे खरं आहे. आपल्या संसाराची सुरुवात करताना आपल्याला मिळालेल्या मित्रांच्या आहेरातून आणि लग्नाची वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबीयांना धान्यदानाचे सत्कार्य करुन लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवलंय प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडे याने, ‘तुम्ही मला जो लग्नाचा आहेर देणार आहात, तो मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी दिलात, तर मला जास्त आनंद होईल,” असा मेसेज आपल्या मित्रांना लग्नाच्या आदल्या दिवशी टाकला आणि आपल्या वरातीचा प्लॅन रद्द करत त्याचा खर्चही प्रफुल्लने मंडळाला दिला.

नवदांपत्याच्या हस्ते धान्यदान

गरीब आणि गरजू लोकांप्रती असलेली त्याची भावना पाहून त्याच्या मित्रमंडळींनी त्याच्याच इच्छेनुसार आहेर आणि वरातीच्या जमा झालेल्या पैशातून गरीबांसाठी धान्य विकत घेतले आणि लग्नबंधनात अडकल्यानंतर गावडे नवदाम्पत्यांच्याच हस्ते वडाळा पश्चिमेला फुटपाथवर राहात असलेल्या 60 गरीब कुटुंबीयांना धान्यदान करण्याचे अनोखे सत्कार्य साकारले.

गेल्या 50 दिवसांपासून अन्नदान

गेले 50 दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत, म्हणून प्रफुल्ल गावडे धडपडत होता. अन्नदान करत होता. कितीही अन्नदान केलं तरी ते कमीच होतं.

लोकांची मागणीही धान्याचीच असायची; पण ती पूर्ण करण्याची क्षमता ना मंडळाची होती ना प्रफुल्ल गावडेची. त्यामुळे धान्यदान करता येत नव्हते; पण गरजूंना किमान 15 दिवसांचे तरी धान्य द्यायचे हा विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता.

भावस्पर्शी आवाहन

टाळेबंदीमुळे अनेकदा लांबणीवर पडलेल्या प्रफुल्लच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू होती. मित्रांचा लाडका असलेल्या प्रफुल्लला त्याच्या गरजेची महत्त्वाची वस्तू आहेर म्हणून देण्याची तयारी त्याचे मित्र करत होते.

ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या भावस्पर्शी मनाला हे खटकलं. माझ्यापेक्षा अधिक गरज त्या असंख्य गरीब-गरजू कुटुंबांना आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी दोनवेळचे अन्नही नाही.

मला आहेर नको, तेच पैसे तुम्ही गरीबांच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या मंडळाच्या उपक्रमासाठी वापरावेत, अशी इच्छा प्रफुल्लने व्यक्त करून त्याच पैशातून गरीब कुटुंबीयांना धान्यदान करा, असे स्पष्ट संकेतही दिले.

 

You might also like
2 li