चांगलं काम करा, जेवायला घरीच येतोः राज ठाकरे यांची भन्नाट ऑफर

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफर त्यांनी दिली. राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे.

राजसंवाद सुरू

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज यांनी सुरू केलं आहे.

राज यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मतदारसंघ निहाय माहिती घेतली. स्थानिक प्रश्न आणि पुण्यातील राजकीय वातावरण, जनतेचा कल याविषयीचीही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नवचैतन्य संचारेल ?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखाध्यक्षांनी जोमाने काम करावे, यासाठीच राज यांनी ही ऑफर दिली आहे.

तसेच पुण्यात संघटनात्मक बांधणी चांगली व्हावी, हा हेतूही या ऑफरमागे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज यांनी ही ऑफर दिल्याने मनसेत नवचैतन्य संचारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनविसेच्या बैठकीकडे लक्ष

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.