मुंबई : आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) जामीन मंजूर झाल्यानंतर यांच्या समर्थकांनी मुंबईमध्ये (Mumbai) जल्लोष केला आहे. तसेच मुंबईतील जुहू (Juhu) परिसरात राणेंच्या फोटोंसह (Photo) कविता लिहून बॅनरबाजीही (Banner) करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.
संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी राणेंचा जामिन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला होता. परंतु आता न्यायालयाकडून त्यांना जामिन मिळाला असून ते सिंधुदुर्गला (Sindhudurg) रवाना झाले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत मुंबईच्या रस्त्यांवर बॅनरबाजी केली आहे.
राणे यांच्या बॅनर्सवर प्रेरणादायी कविता लिहिल्या आहेत. घाबरून जगू नकोस, मान झुकवू नकोस, प्रवास अवघड आहे, पण थांबून हार मानू नकोस, तू योद्धा आहेस. हे तुझे कुरुक्षेत्र, अशा आशयाचे बॅनर मुंबईच्या रस्त्यांवर झळकत आहेत.
परंतु याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी रात्री उशिरा जुहू परिसरातील काही बॅनर उतरवले. तसेच बॅनर लावलेल्या व्यक्तीलाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून अधिक तपास करत आहेत.
दरम्यान नितेश राणे यांना जामीन मिळताच ते म्हणाले की, मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो.
मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो होतो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे.
ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.