कोरोना साथरोगात आशेचा किरण ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून भारतासह अनेक देशांना दिलासा देणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने १३ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी घोषणा केली.

सन्मानपत्र आणि एक लाख रुपये

लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी एक ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिराऐवजी १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा कार्यक्रम होणारा असून तो केवळ निमंत्रितांसाठी आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे असतील. महापौर मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे टिळक यांनी सांगितले.

‘सीरम’च्या कार्याचा गौरव

‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या सहकार्याने सीरमने कमी कालावधीत ‘कोव्हिशिल्ड’च्या कोट्यवधी लसमात्रांचे केलेले उत्पादन संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरले आहे. ‘सीरम’ने मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Advertisement

लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वाप्रमाणे असलेल्या ‘सीरम’च्या कार्याचा गौरव करीत आहोत,’ अशी माहिती टिळक यांनी दिली.

पूनावालांचा सन्मान

डॉ. पूनावाला यांचे शिक्षण बिशप स्कूल आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) झाले. त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळवली. केंद्र सरकारने २००५ मध्ये पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला. ‘ग्लोबल अलायन फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन’ने ‘व्हॅक्सिन हिरो’ म्हणूनही त्यांना गौरविले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचा डॉक्टरेट देऊन गौरव केला आहे. टिमविची ‘डी.लिट’ तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले आहेत. पूनावाला समूहाने शाळांची उभारणी; तसेच कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन यांसह अनेक कामांसाठी योगदान दिले आहे.

Advertisement