रस्त्यांवरील खड्ड्यातून गाडी हळू चालव, असे सांगणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या चालक-वाहकाला राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे.

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

रस्त्यावरील खड्ड्यातून वेगाने गाडी चालवल्याने प्रवाशांना धक्के बसतात. एसटी बसही खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात त्रास होतो.

त्यामुळे गाडी हळू चालवण्याबाबत वृद्ध चालक-वाहकाला सांगितले; मात्र याचा राग डोक्यात ठेवत वाडा एसटी स्थानकात उतरल्यानंतर त्या दाम्पत्याला एसटीच्या चालक व महिला वाहकाने मारहाण केली होती.

Advertisement

ठाणे जिल्ह्यातील वाडा एसटी स्थानकात एका वृद्ध दाम्पत्याला एसटी चालक आणि वाहकाने मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तसेच त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

कठोर कारवाई करणार

‘वाडा ( ठाणे-जिल्हा ) एसटी स्थानकात एका दाम्पत्याला एसटीच्या चालक व वाहकांकडून झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीचे एसटी महामंडळ कदापि समर्थन करणार नाही.

या घटनेची दखल घेत संबंधित चालक-वाहक यांना तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. तथापि, या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी असलेल्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येणार आहे’, असे ट्वीट महामंडळाने केले.

Advertisement

ही आहेत कारवाई केलेल्यांची नावे

चालक गोरखनाथ नागरगोजे आणि वाहक शीतल पवार अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेबद्दल एसटी महामंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

Advertisement