जम्मू येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.

पुण्यात लष्करी संस्थांची संख्या लक्षात घेता पुण्यात कोणत्याही खासगी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक ठिकाणी ड्रोनच्या वापराला परवानगी दिली जात नाही.

आतापर्यंत केवळ शासकीय कामांसाठीच ड्रोनचा वापर करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिली.

Advertisement

पुण्यात संवेदनशील ठिकाणे अधिक

जम्मू येथील विमानतळावर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यासारख्या महत्त्वाच्या लष्करी कार्यालये व आयुध निर्माण संस्था अशी अनेक संवेदनशील ठिकाणे येथे आहेत.

येथील माहिती मिळविण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा पाकिस्तानकडून केला गेला आहे. त्यापार्श्वभूमीवर ड्रोनचा वापर करून या संस्थांची अंतर्गत माहिती घेण्याचा अथवा हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

बंदिस्त जागेसाठीच ड्रोन वापराला परवानगी

पुणे शहरात कोणालाही खासगी कार्यक्रमासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच लष्करी आस्थापना असलेल्या परिसरात ड्रोन वापरास परवानगी दिली जात नाही. ड्रोनच्या वापरासाठी विशेष शाखेकडून परवानगी दिली जाते.

Advertisement

कोणी परवानगी मागितली तर स्थानिक पोलीस ठाण्यांचा अहवाल मागविला जातो. त्यानंतर बंदिस्त जागेसाठी अथवा एकाच ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाते.

 

Advertisement