वडगाव पंपिग स्टेशनमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील केदारेश्वर आणि महादेवनगर टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नाही. परिसरात रात्री अपरात्री पाणी येते.

दक्षिण पुण्यातील नागरी वस्ती आणि आजूबाजूला नवीन इमारती पाहता टाकीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

पाणीटंचाईचे संकट

दक्षिण पुण्यातील नागरिकांसमोर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभा राहिले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

कात्रज-आंबेगाव-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. प्रशासनाने पाणीपुरवठ्यांविषयी काळजी घेऊन पाणी संकट दूर करण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाचा ढिसाळपणा

यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत नव्हते; मात्र आता केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा त्रास झाला नाही; मात्र आता पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

प्रशासनाने सोमवारपासून पाणीपुरवठ्यात बदल केला आहे. या भागातील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद राहणार आहे.

राजीव गांधी पंपीग स्टेशन येथून केदारेश्वर आणि महादेवनगर या टाक्यांना पाणीपुरवठा केला जातो.

या दोन्ही टाक्यांतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसराचे प्रशासनांकडून सात उपविभाग करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे एका उपविभागाचा आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.