Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पावसामुळे मुंबईनजीकच्या नद्या तु़डुंब

पावसामुळे मुंबई भोवतीच्या जवळपास सर्वच नद्या तुडुंब वाहताना दिसत आहेत. पाऊस जर असाच सुरु राहिला, तर पुढचे काही तास हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आव्हानाचे राहतील. सुदैवाने पाऊस थांबला तर पावसाचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल.

पावसाचे थैमान

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत तर पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे.

काही भागात घरांमध्ये, सोसायटीत तर कुठे चाळींमध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. शहराशहरांमध्ये रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे.

Advertisement

ठाण्याच्या शिळफाटा किंवा मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही महामार्गांवर दरड कोसळल्याच्या आहेत.

मुंबईच्या नॅशनल पार्कमधील नदीला पूर

मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आल्याची माहिती आहे. पुरामुळे ही नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमधील वस्ती आणि कार्यालयातदेखील पाणी शिरलं आहे.

पावसाचा जोर असाच सुरू राहिला, तर प्रशासनाला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागेल.

Advertisement

मुंबईतील दुसरी महत्त्वाची मानली जाणारी पोईसर नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिमेतील मैदानातही मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

बदलापूरची चौपाटी पाण्याखाली

मुंबईजवळ असणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर शहरातदेखील गेल्या 24 तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे.

त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदी ही पुणे आणि रायगड जिल्ह्यातून वाहत येऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. कर्जतहून बदलापूर आणि पुढे कल्याणकडे ही नदी वाहत जाते.

Advertisement

वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय.

वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. या नदीला मोठा प्रवाह आला आहे.

ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते. या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूलसुद्धा पाण्याखाली गेले होते.

Advertisement

 

Leave a comment