पुणे : पावसाळ्यात केवळ साथीचे विकार वाढतात असे नाही, तर अन्य विकारही वाढतात. पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ आणि कोरडे न केल्यास कानांमध्ये बुरशी तसेच जीवाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

कानात बुरशी होण्याची भीती

कानाच्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा, ऐकायला येणे कमी झाले असता किंवा कानातून पाणी येत असता त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. पावसाळ्यात दिसणाऱ्या नियमित आजारांमध्ये कानांना होणाऱ्या संसर्गाचा समावेश आहे. कानाची आतील बाजू किंवा बाहेरील भागात होणारा बुरशीचा संसर्ग आणि वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांचा सल्ला

कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पूर्वा लुनावत म्हणाल्या, कान दुखणे, ऐकू कमी येणे, कानातून पाणी येणे, चक्कर येणे, तीव्र डोके दुखी किंवा ताप अशी लक्षणे दिसतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळ्याची नियमित सुरुवात होण्याआधीच असे रुग्ण येत आहेत. कान स्वच्छ करण्यासाठी टोकदार वस्तूचा वापर टाळणे, अंघोळ तसेच पोहण्याचा व्यायाम केल्यानंतर कान पुसून कोरडे करणे, गाणी ऐकण्याचे ‘हेडफोन’ नियमित स्वच्छ ठेवणे या सवयी संसर्गापासून रोखण्यास मदत करू शकतात. कानाचा संसर्ग औषधांनी बरा न झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते.

Advertisement

ओलावा धोकादायक

कानातील बुरशी किंवा जंतुसंसर्गाला ‘ऑटोमायकॉसिस’ असे म्हणतात. पावसाळ्यात कानात ओलावा राहिला असता बुरशी किं वा जीवाणू संसर्गाचा धोका वाढतो. असा संसर्ग झाल्यास पाच दिवस औषधोपचार, त्यानंतर कान स्वच्छ करून बुरशी काढून टाकणे या गोष्टी कराव्या लागतात.