माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे यांच्या सुरू असलेल्या चाैकशीनंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्यामागं ‘ईडी’ च्या चाैकशीचा ससेमिरा लागला आहे.

आणखी बडे नेते रडारवर

शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ई़डीने दळवी यांची 25 जूनपासून आतापर्यंत चार ते पाचवेळा ईडी कार्यालयात बोलावून चौकशी केली.

पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएलचे मालक राकेश वाधवान यांच्या आर्थिक व्यावहारासंबंधी ही चौकशी सुरू आहे.

Advertisement

प्रमोद दळवी यांच्या चौकशीतून वसई-विरारमधील बांधकाम व्यवसायिकांसह मुंबईतील शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रमोद दळवी कोण आहेत ?

प्रमोद दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. ते वसई विरारसह मुंबईतील बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक आहेत.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट, माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुरा दळवी यांनी सांभाळली आहे

Advertisement

दळवी यांच्या घरातून एक कोटींच्या नोटा

नोटाबंदी काळात तत्कालीन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना एक कोटी 15 लाखांच्या नव्या नोटांसह प्राप्तिकर आणि आणि स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले होते.

त्या नव्या नोटा प्रमोद दळवी यांच्या घरातून गावडे यांनी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. याच घटनेत गावडे आणि प्रमोद दळवी यांच्या घरांची दोन दिवस तपासणी झाली होती.

 

Advertisement