भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीतील गैरव्यवहारामुळे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना वारंवार चाैकशांना सामोरे जावे लागते आहे. आताही ईडीने त्यांची चाैकशी सुरू केल्याने त्यांच्या राजकीय पुनर्वसनात मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीला अडचण

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली 40 वर्षे असलेल्या खडसे यांची पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.

खडसे यांची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठीच्या १२ जणांच्या यादीत खडसे यांचे नाव असून, राज्यपालांनी ही यादी रोखून धरली आहे.

पडत्या काळात एकाकी

भाजपत असताना खडसे एकेकाळी राज्याचे नेतृत्व करत होते. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा त्यांना फटका बसला.

अशा वेळी संकटात सापडल्यावरही बहुजन समाजाचा नेता अशी स्वतःची नवी ओळख खडसे यांनी निर्माण केली; पण असे असले तरी त्यांनी बहुजनच नाही तर त्यांच्या समाजातही कुटुंबीयांव्यतिरिक्त नवे पक्ष नेतृत्व तयार होऊ दिले नाही, असा आरोप खडसे यांच्यावर केला जातो.

Advertisement

खडसेंच्या राजकीय महत्वाकांक्षांना पक्षानेही वेसण न घातल्याने आपोआपच त्यांचे शत्रू वाढत गेले. पर्यायाने आज पडत्या काळातही खडसे यांची साथ कुणी द्यायला तयार नाही, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

घरातच पदे वाटल्याचा आरोप

खानदेशात भाजप वाढवत असताना घरातच त्यांनी पदे वाटली. त्यातून सहकारी संस्थांमधून गेल्या अनेक वर्षांपासूनचे मराठा समाजाचे प्राबल्य ते हळूहळू कमी करत गेले.

त्यांनी सून रक्षा खडसे यांना लोकसभेवर निवडून आणले, त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले. पत्नी मंदाकिनी खडसे यांना जिल्हा दूध संघाचे आणि नंतर महानंदचे अध्यक्ष केले.

Advertisement

मुलगी रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केले. मराठा समाजाच्या नेत्यांना दूर सारत लेवा पाटीदार समाजाच्या महिलांना मानाची पदे पदरात पाडून घेतली.

यामुळे खडसे यांच्याविषयी नाराजी पसरली. हेच कदाचित आज खडसे अडचणीत असतानाही त्यांच्या पाठीशी कुणीही ठामपणे उभे न राहण्याचे कारण असावे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

Advertisement