पुणेः मुसळधार पावसामुळे आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने दोन वर्षांपूर्वी शांतीनगर, इंदिरानगर आणि भारतनगर झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. यामध्ये मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या वर्षीही पूरस्थिती असल्याने महापालिकेने पूररेषेत येणाऱ्या आठशे कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.

पूररेषेत झोपड्या

गेल्या काही वर्षांपासून नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी शिरून पूरस्थिती निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यातच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुळा नदी पात्र सोडून वाहू लागल्याने शांतीनगर, इंदिरानगर आणि भारतनगर झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले होते.

Advertisement

पावसाळ्यात पुराची टांगती तलवार

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने वेळीच नागरिकांचे स्थलांतर केल्याने मोठी जीवितहानी टळली होती. पालिकेने सुमारे पाचशेहून अधिक कुटुंबांचे जवळील शाळांमध्ये स्थलांतर केले होते; मात्र पुराच्या पाण्यामुळे शेकडो कुटुंबीयांचे जीवनावश्यक साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे पूर रेषेत घरे उभारणाऱ्या कुटुंबीयांवर दर वर्षी पावसाळ्यात पुराची टांगती तलवार आहे. मागील आठवड्यातील गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री नदीकाठची पाहणी करून पुराची शक्यता असल्याने झोपडपट्टीधारकांना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

‘काम पूर्ण झाल्यावर पुनर्वसन’

Advertisement

‘शांतीनगरमधील ४५०, इंदिरानगरमधील २५० आणि भारतनगरमधील १०० अशा सुमारे आठशे झोपड्या पूररेषेत उभारल्या गेल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यावर या झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे दर वर्षी शेकडो कुटुंबीयांना पुराचा धोका कायम राहणार आहे.

त्यामुळे महापालिकेने पूररेषेत उभारणाऱ्या झोपडपट्ट्यांचे ‘एसआरए’मध्ये पुनर्वसन करण्याची मागणी दोन वर्षांपूर्वीच तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. शांतीनगरमध्ये ‘एसआरए’ योजनेंतर्गत मोठ्या इमारतींचे काम पूर्णत्वास आले आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्राधान्याने पूररेषेतील झोपड्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे,’ अशी माहिती नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

Advertisement