मुंबई – “मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात (BJP) जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाच्या (BJP) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) हे काही दिवसांपू्र्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता. मात्र, आता सर्व राजकीय अफवांना स्वतः एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

तसेच, यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील काही गंभीर आरोप केले आहेत. “जर येणाऱ्या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही’, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा तसंच भाजप खासदार रक्षा खडसे हे अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा रंगली होती. तसंच एकनाथ खडसे हे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी एक मोठं विधान केलं होत. “तब्बल तीन तास वेटींगवर ठेवूनही अमित शाह यांनी खडसेंना वेळ दिला नाही, अमित शाह यांनी खडसेंची भेट घेतली नाही’. असा दावा गिरीश महाजन यांनी यावेळी केला होता.