मुंबई – क्रिकेट संघटनांच्या निवडणुका आणि राजकीय नेते यांचे नाते नवे नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी संघटनांच्या निवडणुकीची चांगलीच चर्चा होते. एकीकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) अध्यक्षपदाची निवडणूक. अंधेरीत भाजपा-शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत दिसली.

मात्र, एमसीए निवडणुकीत (MCA Election) एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे भाजपा (Bjp) , शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्ष एकत्र आलेले दिसले. यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे विविध राजकीय पक्षांचे पुढारी ज्या निवडणुकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज होत आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं.

आज पार पडत असलेल्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वानखेडे मैदानावरील गरवारे क्लब येते हे तिन्ही नेते सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच एकत्र आले. या कार्यक्रमाचा राजकारणाशी काहीही थेट संबंध नव्हता तरी या मंचावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी (eknath shinde) सूचक वक्तव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा दिला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांनी या कार्यक्रमामध्ये छोटेखानी भाषणं केली. या भाषणांदरम्यान तिन्ही नेत्यांनी तुफान शाब्दिक चौकार, षटकार लगावत उपस्थितांची दाद मिळवली.

मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता आपल्या भाषणामधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा देत जोरदार टोला देखील लगावला आहे.

‘मी आणि फडणवीस एकत्र आहोत. आम्हाला थोडी थोडी बॅटींग येते’ असं शिंदेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. पुढे बोलताना शिंदेंनी, ‘आम्ही तीन महिन्यांपूर्वी थोडीशी बॅटींग केली’ असं म्हणत सत्तासंघर्षाचा संदर्भ दिला.

यावर बाजूलाच बसलेल्या शरद पवारांनी संधी मिळाली तर कॅचही घेतात अशा आशयाचं विधान केलं अन् शिंदेंनाही हसू आलं. तसेच ते पुढे म्हणाले, ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची झोप उडू शकते’ असं विधान शिंदेंनी आपल्या भाषणात केलं.

“पवारसाहेब आपण जे म्हणालात त्याने मला आनंद झालेला आहे. माझ्या बाजूला देवेंद्रजी आहेत त्यांनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिष (शेलार) आहे त्यालाही आनंद झाला आहे. पण काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काही लोकांची झोप उडू शकते”. असं शिंदे यावेळी म्हणाले.